डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी

 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला.  

 

ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या घटनांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेेते बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये आंदोलनादरम्यान केली. 

 

मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही आणि महिलांविरुद्ध होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असल्याचं मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलं. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी तोंडाला काळी फीत बांधून सरकारचा निषेध केला. लाडकी बहीण योजना नाही, तर सुरक्षित बहीण योजना गरजेची आहे, असं त्या म्हणाल्या. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली. याशिवाय, गडचिरोली, धुळे, वाशी, गोंदिया आणि नागपूर इथंही महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी बदलापूरच्या घटनेच्या विरोधात निदर्शनं केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा