मुंबईत आज भारत-संयुक्त अरब अमिराती यांच्यात बिझनेस फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं. अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी याचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबंध हेवा वाटावे असे आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलं. यूएई हा भारताच्या प्रगतीतला महत्वाचा भागीदार आहे, दोन्ही देशांमधल्या देवाणघेवाणीत विकसित भारताचं उद्दिष्ट सामाववलेलं आहे, असंही ते म्हणाले.
या फोरममध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात दहा करार करण्यात आले. यात जैविक शेती, प्रक्रिया केलेल्या अन्नाची आयात, लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना आदी करारांचा समावेश आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यापारविषयक सामंजस्यासंबंधी दोन बाबींवर अबुधाबीचे राजपुत्र शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये भारत-यूएई व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर द्वारे मैत्री इंटरफेसवर व्हिटीसीची सुविधा देणं समाविष्ट आहे. तसंच खनिजांच्या पुरवठा साखळीतील लवचिकता वाढवण्यासाठी आरएससी लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, खनिज बिदेश इंडिया लिमिटेड आणि ओएनजीसी इंडिया लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार करण्याचे निश्चित झाले आहे.