आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर ८ गडी राखून विजय मिळवला.
भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून ६४ धावा केल्या. भारतातर्फे वैष्णवी शर्मानं ३ बळी मिळवले. विजयासाठी ६५ धावांचं लक्ष्य घेउन फलंदाजीसाठी उतरल्यावर भारतातर्फे गोंगडी त्रिशानं ३१ चेंडूत ४० धावा केल्या. तर, सानिका चाळकेनं ५ चेंडूत नाबाद ११ धावा केल्या. वैष्णवी शर्मा, या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
भारतानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं असून, सुपर सिक्स फेरीतला भारताचा अंतिम सामना येत्या मंगळवारी स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे.