महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारातनं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिने नाबाद ४४ तर सानिका चाळकेनं नाबाद २६ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ फारशी चमकदार खेळी करू शकला नाही. अवघ्या ८२ धावा करून दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज तंबूत परतले. माईक वॅन वुर्स्ट च्या २३, जेम्मा बोथाच्या १६ आणि फे कॉवलिंग हिच्या १५ धावा सोडल्या इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. भारताच्या गोंगदी त्रिशानं सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर पारुनिका सिसोदिया,आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन आणि शबनम शकिल हिनं एक गडी बाद केला. गोंगदी त्रिशा हिला सामना वीर आणि मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलं.