राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना आज किल्ला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यापैकी गुरमैल सिंग याला येत्या २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली तर धर्मराज कश्यप याच्या वयाची चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा हजर करण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची १५ पथकं सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून अन्य राज्यांच्या पोलिसांची मदतही घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी वार्ताहर परिषदेत दिली. कुख्यात बिष्णोई टोळीचा या हत्येत सहभाग असल्याचे समाजमाध्यम संदेश प्रसारित झालं आहे, त्या संदेशाच्या सत्यतेविषयीही तपास सुरू असल्याचंही या वार्ताहर परिषदेत पोलिसांनी स्पष्ट केलं.