डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवी मुंबईत बेलापूरमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

राज्यात नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या सेक्टर १९ मधल्या शाहबाज गावातली एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मदत आणि बचावकार्य पूर्ण झालं असून ५२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक मदत देण्याची सूचना केल्या होत्या. या घटनेतल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीचाही शिंदे यांनी आज आढावा घेतला. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करावीत, गरज भासल्यास भारतीय लष्करालाही पाचारण करावं, असे निर्देश त्यांनी दिले. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारशी समन्वय साधून काम करावं, असंही शिंदे यांनी सांगितलं.      

सांगली- कोल्हापूर जिल्ह्यातला  महापूराचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा इथली पाणी पातळी नियंत्रित करण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषांप्रमाणे कार्यवाही करावी असं आवाहन कृष्णा महा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असल्याचं समितीचे कार्यकारी सदस्य आणि सेवानिवृत्त उप अभियंता विजयकुमार दिवाण यांनी सांगितलं

पुण्यात पुराचं पाणी शिरणाऱ्या भागात सीसीटीव्ही आणि पाऊस मोजणी यंत्रं बसवली जातील, असं पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे. 

जळगाव जिल्ह्यात पावसानं गेल्या २४ तासांपासून विश्रांती घेतली आहे. त्याआधी दोन दिवस तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं तापीवरच्या हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

नवापूर तालुक्यात काल एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार गोवाल पाडवी यांनी पाहणी केली आहे.  

गोंदियात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून तात्काळ पंचनामे सुरु करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत 

 
 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा