मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नाशिकमध्ये दिंडोरी इथं आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सुरू आहे. ही योजना राजकीय हेतूने प्रेरित नसून महिलांच्या सबलीकरणासाठी आणलेली आहे. येत्या १७ ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात या रकमेचा हप्ता जमा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
हे जनतेचं सरकार असून या सरकारमुळेच मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाची माफी तसंच वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. कांद्याच्या निर्यात धोरणामुळे शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे कांद्यावरच्या निर्यातीवरचे निर्बंध शिथिल करून ती सुलभ करावी यासाठी केंद्र शासनाला सांगितल्याचंही ते म्हणाले. नाशिक इथल्या नार-पार नदी जोड प्रकल्प तसंच किकवी धरणाला मंजुरी देणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.