तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन इथं पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. शेतकऱ्यांना तूर, मसूर आणि उडदाचा योग्य भाव मिळावा याकरता राज्यसरकारांनी प्रभावी आणि पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या ४ वर्षात या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आलं आहे. केंद्रसरकारने चालू रबी हंगामात ३७ लाख ३९ हजार टन कडधान्यांच्या तर २८ लाख २८ हजार टन राईच्या खरेदीला मान्यता दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खरीपातली तूर खरेदी २ लाख ४६ हजार टन पर्यंत झाली असून त्याचा फायदा १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र, गुजरात,आंध्र प्रदेश, तेलंगण,आणि कर्नाटकमधे हमीभावाने खरेदी सुरु असून कर्नाटकात खरेदीची मुदत १ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.