खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्रसरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली एकूण १३ लाख २२ हजार टन तूर याअंतर्गत खरेदी केली जाणार आहे.
आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत डाळींचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आणि तेलंगणात नाफेड आणि NCCF, अर्थात राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघामार्फत किमान आधारभूत दरानं खरेदी सुरु असून कालपर्यंत ३ लाख ९२ हजार टन तुरीची खरेदी झाली आहे.