नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगाने करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून प्रयागराजच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगाने सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी खासगीकरणातून कामे करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरूवात हेाईल असं त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुध्द करण्यासाठी नगरपालिकेने तयारी केली असून त्यांना लवकर कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या समवेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन कुशावर्ततीर्थ तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. आणि विधीवत पूजा केली. तसंच विविध आखाड्यांच्या साधु महंतांशी संवाद साधला.