डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशविदेशातल्या मान्यवरांकडून रतन टाटा यांना आदरांजली अर्पण

मुंबईत NCPA मध्ये विविध क्षेत्रातले मान्यवर, उद्योगपती, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत.
टाटा यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत एनसीपीए मध्ये ठेवण्यात येणार आहे. वरळीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रात्री रुग्णालयात त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, जेष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं.
विविध देशांच्या मुंबईतल्या दूतावासांचे राजदूत, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल देशभरातल्या वरिष्ठ राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातल्या प्रमुखांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनानं राष्ट्र निर्माणाला कार्पोरेट विकास आणि नैतिकतेची उत्कृष्ट जोड देणारं व्यक्तीमत्व हरपलं आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भव्य स्वप्नं पाहण्याची आणि समाज ऋण फेडण्याची त्यांची तळमळ अद्वितीय होती, या शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्यपाल सी पी राधाकृष्णन्, सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. याशिवाय भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योजक अनिल अग्रवाल, गौतम अदानी, आनंद महिंद्रा, टाटा यांनी शिक्षण घेतलेलं कोर्नेल विद्यापीठ यांनीही रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.
टाटा यांनी व्यापार आणि परोपकारात आपली अमिट छाप सोडली असल्याचं कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं.

रतन टाटा यांनी मागे ठेवलेला उद्योग आणि परोपकाराचा असामान्य वारसा भारताच्या आधुनिक उद्योग नेतृत्वाच्या विकासाला नेहमी मार्गदर्शक ठरेल, असं गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.
न्यूयॉर्कमधल्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमधली पदवी पूर्ण केल्यानंतर १९६२ मध्ये रतन नवल टाटा, टाटा समुहात रूजू झाले. त्यानंतर १९७५ त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन विषयातलं शिक्षण पूर्ण केलं. टाटा समुहातल्या अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यावर १९७१मध्ये National Radio & Electronics Company Limited कंपनीचं प्रभारी संचालकपद दिलं गेलं. १९८१ मध्ये ते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष झाले. १९९१ पासून २८ डिसेंबर २०१२ पर्यंत ते टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात समुहाचा महसूल कित्येक पटीनं वाढला आणि २०११-१२ मध्ये १०० अब्ज डॉलरच्या पलीकडे गेला. रतन टाटा यांच्याच नेतृत्त्वाखाली टाटा मोटर्सनं प्रवासी वाहन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर नॅनो ही गाडी बाजारात आणली आणि जग्वार लँड रोव्हर ही ब्रिटीश कंपनी विकत केली. रतन टाटा यांच्या मार्गदर्शनात टाटा स्टीलनं कोरस, टाटा समुहानं VSNL, टाटा टी नं टेटली हा ब्रिटीश समूह अधिग्रहित केला. २०२१ मध्ये एअर इंडियाच्या बोलीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर रतन टाटा यांना खूपच आनंद झाला होता. जेआरडी टाटा आज आपल्यात असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता, अशी प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली होती. सेवानिवृत्तीनंतर रतन टाटा यांना टाटा सन्ससह इतर अनेक कंपन्यांचं मानद अध्यक्षपद दिलं गेलं होतं. टाटा समुहातल्या इतर सदस्यांप्रमाणे, त्यांनीही सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं. शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रातल्या त्यांच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर दीर्घ परिणाम दिसून येतो आहे. प्राणी, विशेषतः भटके कुत्रे आणि मांजरांची त्यांना विशेष काळजी होती. नुकतचं त्यांनी टाटा ट्रस्टकडून मुंबईत प्राण्यांसाठीचं रुग्णालय सुरू केलं होतं. वातावरण बदलासाठी कार्यरत असलेल्या इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हचे ते संस्थापक होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. केंद्र सरकारनं २००८ मध्ये त्यांना पद्मविभुषण देऊन गौरवलं होतं. गेल्याच वर्षी राज्य सरकारनं पहिला उद्योग रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा