डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी काल त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रउभारणीतलं डॉक्टर आंबेडकरांचं योगदान दर्शवणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अन्य मान्यवरांनी नवी दिल्लीतल्या प्रेरणा स्थळ या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकस्थळी पुष्पांजली अर्पण केली. डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ होते. त्यांनी समता आणि मानवतेसाठी दिलेला लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.

 

दादरमधल्या चैत्यभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. अशोक स्तंभाजवळील भीमज्योतीलाही मान्यवरांनी अभिवादन केलं. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढं घेऊन जाणं, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्यतेचं उच्चाटनं करणं हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असेल, असं राज्यपाल आदरांजली वाहताना म्हणाले.
देशाच्या विविध क्षेत्रांमधल्या नेत्रदीपक प्रगतीचं श्रेय आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असं सांगून देश संविधानाच्या मार्गानंच जगातली महाशक्ती बनू शकतो. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा महत्त्वाचं भारताचं संविधान असेल हा कृती संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आंबेडकरांच्या संविधानामुळे देशाची समृद्धी आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मानवतेच्या कल्याणाचा मार्ग आंबेडकरांनी जगाला दाखवला. देशाला एकता, बंधुता आणि समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद त्यांच्या विचारात आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

 

चैत्यभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह लाखो नागरिक उपस्थित होते. भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या लेखक नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनाच्या प्रांगणातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार, गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

 

नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलानं महापरिनिर्वाण दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय संविधानाची मूल्यं जाणून ती आचरणात आणणं हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यावेळी म्हणाले. रत्नागिरीतल्या आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या आवाहनानुसार अनेकांनी वह्या-पेनं, शैक्षणिक साहित्य अर्पण करून बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केलं. धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक समरसता मंचानं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. धुळे, बुलडाणा, परभणी, सोलापूर जिल्ह्यातही महामानवाला अभिवादन करण्यात आलं. तसंच रक्तदान शिबीर, रॅली, यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा