भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं.
आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांशी संबंधित असलेली सर्व माहिती या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून उद्योजकांना दिली आहे. ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती विविध मंत्रालये, संस्था आणि संस्थांच्या सहकार्यानं केली असून त्यात काही महत्त्वाची आकडेवारी उद्योजकांना मिळणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या ई- प्लॅटफॉर्मच्या मदतीनं जागतिक बाजारपेठेत भारताचा सहभागी वाढेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्म लवकरच हिंदी आणि अन्य भारतीय भाषांतही उपलब्ध करून दिला जाईल, असं ही त्यांनी सांगितलं.