झारखंडमध्ये, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित केले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राशी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसवर टीका करताना सांगितलं की त्यांचे हेतू राज्याच्या प्रगतीशी जुळत नाहीत. पंतप्रधानांनी राज्यातील शेतीला चालना देण्याच्या उद्देशानं नाचणीसारख्या धान्याचं उत्पादन आणि विक्री वाढवण्याच्या योजना देखील जाहीर केल्या. मोदींनी काल संध्याकाळी रांचीमध्ये भव्य पदफेरी काढली.
झामुमोचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांची इथं निवडणूक सभा घेतली. सोरेन यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यांना विरोध करणारे आवाज भाजप दाबत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, कोडरमा इथं प्रचार सभेत RJD प्रमुख लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. झारखंडच्या निरंतर विकासासाठी त्यांनी मतदारांना I.N.D.I.A. ब्लॉकला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.
पलामू इथल्या एका जाहीर सभेत लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी हेमंत सोरेन यांच्यावर मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. पासवान यांनी दावा केला की झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सोरेन बांगलादेशी घुसखोरांना मतदार म्हणून सुरक्षित करण्यासाठी संरक्षण देत आहे, परिणामी राजकीय तणाव आणखी वाढत आहे.
काँग्रेस, एजेएसयू आणि डाव्या पक्षांचे नेतेही राज्यभर सक्रियपणे प्रचार करत आहेत. बुधवारी राज्यात पहिल्या टप्प्यात 43 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात या महिन्याच्या 20 तारखेला 38 जागांसाठी मतदान होणार आहे.