काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा रद्द झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत नाही, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र राज्यात इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर सर्व समस्यांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासन गांधी यांनी या संदेशात दिलं आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाच प्रचारसभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आज सोलापूर इथं सभा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे माहीममध्ये सभा घेणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आज वरळीत प्रचार करणार आहेत.