दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक वातावरण असलेला भारत निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या सुगम्य भारत अभियानाचा आज नववा वर्धापन दिन आहे. पायाभूत सुविधा, वाहतुकीच्या सोयी आणि सार्वजनिक जागांचा वापर दिव्यांगांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं. तसंच दिव्यांगांचे हक्क आणि त्यांच्या गरजांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीही हे अभियान सुरू करण्यात आलं. गेल्या ९ वर्षांत या अभियानानं आपल्या उद्दिष्टाचे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. सरकारी इमारती तसंच वाहतूक सुविधांची पुनर्रचना करण्यापासून ते सांकेतिक भाषा प्रशिक्षण कार्यक्रम, विमानतळावरचे रॅम्प, शौचालयांची पुनर्रचना, रेल्वे आणि बस स्थानकांमध्ये दिव्यांगासाठी विशेष रॅम्प अशा सोयींचा त्यात समावेश आहे.
सुगम्य अभियानाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिव्यांग जनांसाठी सुलभता, समानता आणि संधींविषयी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पॅरालिंपिक स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटला, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.