नागालँड आपला बासष्ठावा स्थापना दिवस आज साजरा करत आहे. 1963 मध्ये या दिवशी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले. नागालँडच्या इतिहासातील या महत्वपूर्ण मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी राज्यभरात आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम राजधानी कोहिमा इथं होणार आहे. मुख्यमंत्री नेईफिऊ रियो याप्रसंगी लोकांना संबोधित करतील आणि गेल्या साठ वर्षातील राज्याच्या वाटचालीचा आढावा घेतील. नागालँडचे राज्यपाल ल. गणेशन यांनी नागालँड राज्य स्थापना दिवसानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.अतिशय कष्टपूर्वक साध्य केलेली शांतता एक मौल्यवान भेटवस्तू म्हणून लोकांनी जपावी असं आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशातून केलं आहे. दरम्यान नागालँडच्या प्रसिद्ध हॉर्नबिल उत्सवालाही आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाचा या उत्सवाचा 25 वा वर्धापनदिन असून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नागालँडच्या सर्व 17 जमातींचा संगम होत असतो.