आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पामुळे वेल्लोर आणि तिरुपती या शैक्षणिक आणि वैद्यकीय केंद्रांशी संपर्क वाढेल.
केंद्राने पंजाब आणि हरियाणामध्ये पसरलेल्या सहा पदरी झिरकपूर बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली; याचा अंदाजे खर्च एक हजार ८७८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि हिमाचल प्रदेश आणि नवी दिल्लीदरम्यानचा संपर्क सुधारेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने एक हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील परिसर विकास आणि पाणी नियोजन प्रकल्पांच्या आधुनिकीकरणालाही मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पामुळे पाण्याचा वापर आणि कार्यक्षमता तसंच उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल असं म्हटलं आहे.