राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे शहरात ठिकठिकाणी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’उपक्रम काल राबवण्यात आला. साडेतीन लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले. हा प्रतिसाद पाहता आगामी पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यासह राज्य, देश आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक किरण यज्ञोपवीत, रमेश परदेशी, ज्येष्ठ लेखक वसंत लिमये, उद्योजक पुनीत बालन, अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसंच समता भूमी, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आलं. अग्निशमन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.
उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम आप्पा बळवंत चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर इथं पार पडला. यावेळी माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखक सागर देशपांडे यांचं ‘दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर’ या पुस्तकाचं वाचन केलं. पुणे विद्यापीठात हा उपक्रम तसंच भाषा उत्सवानिमित्त अभिनेता प्रवीण तरडे यांनी बोलताना, संस्कृती, प्रदेश, भूगोल, राजकीय मतभेद आणि वैचारिक तटभिंती ओलांडून आपण माणसांशी वागलं पाहिजे, संस्कार वाचनातून होतो आणि ग्रंथ हेच खरं जगण्याचं सामर्थ्य आहे असं सांगितलं. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
Site Admin | December 12, 2024 9:10 AM | 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' | उपक्रम