गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या १४ डिसेंबरला पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे उपस्थित राहणार असल्याचं प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
एकवीस हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं गदिमा पुरस्काराचं स्वरूप आहे. अकरा हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर पाच हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं चैत्रबन आणि विद्या प्रज्ञा पुरस्कारांचं स्वरूप आहे.