मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पथकरातून सवलत दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदी जोड योजना, दमणगंगा-वैतरणा-गोदावदी नदी जोड योजना तसंच वैजापूर तालुक्यातल्या शनीदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्यालाही मान्यता देण्यात आली. दमणगंगा-एकदरे-गोदावरी या योजनेतून मराठवाड्यातील 10 हजार 11 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल. तर दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेचा लाभ नाशिक जिल्ह्यातला अवर्षणग्रस्त सिन्नर तालुका आणि मराठवाड्यातल्या जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला होणार आहे. शनीदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्यामुळे 1 हजार 978 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या मेट्रो मार्गिकांना मान्यता देण्यात आली. या मार्गिंकांची लांबी 31 किलोमीटर असून त्यामध्ये 28 उन्नत स्थानकं आहेत. यासाठी 9 हजार 817 कोटी 19 लाख रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातली राज्य शेती महामंडळाची 131 हेक्टर जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला. ठाणे तालुक्यातल्या पाचपाखाडी इथली जमीन प्रशासकीय भवनासाठी ठाणे महानगरपालिकेस देण्याचा आणि खिडकाळी इथली जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेविषयी जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करण्याचा, तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला पद्मविभूषण रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला.