संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन विधेयक, जम्मू काश्मीर विनियोजन विधेयक आणि भारतीय वायुयान विधेयक ही ४ विधेयकं मंजूर झाली, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर सुमारे २२ तास चर्चा झाली, असं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. या अधिवेशनात राज्यसभेत सुमारे ९० तास कामकाज झालं, असंही त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील जनतेची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी मुंबई वायव्य मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केली असून आज ती लोकसभेत पटलावर ठेवण्यात आली.