टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकून बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची, काल मुंबईत लाखो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीनं अत्यंत जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडीयमपर्यंत खुल्या बसमधून निघालेल्या या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले चाहते हातात तिरंगा घेऊन, आणि आपल्या लाडक्या खेळाडूंच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीत भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी पंतप्रधानांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली. दरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील, मुंबईतील चार क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यासाठी आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत हा प्रस्ताव मांडला. आज विधानभवन संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. कर्णधार रोहित शर्मासोबतच सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.