संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण हवाई प्रदर्शन म्हणजे आयडॅक्स-२४ चं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झालं. आजपासून चौदा तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. अनेक उत्पादनं आणि तंत्रज्ञानांची चुणूक त्यात बघायला मिळणार आहे. यंदाच्या तरंग शक्ती सरावाचा हा दुसरा अंक असून त्यात १० देश सहभागी झाले आहेत, तर १८ देश निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत. तरंगशक्तीमध्ये भारत आणि मित्र देशांच्या हवाई सामर्थ्याची आणि नवनवीन आविष्कारांची चुणूक नागरिकांना बघायला मिळणार आहे.