राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. येत्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.
होल्ड व्हाइस कास्ट
मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे एकूण ४० आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या २१, शिवसेनेच्या १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांना मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३२, शिवसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत. मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल, अशी माहिती भाजपा नेत्यांनी वृत्तसंस्थेला दिली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर १० दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार होतो आहे.
मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होण्याची ही १९९१ नंतरची पहिलीच वेळ आहे. १९९१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे झाला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा मंडल आयोगाच्या अहवालावरून भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.