सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले असून त्यांनी शांतता आणि संयम बाळगावा, असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुतळ्याच्या परिसरात पोलीस तैनात केले आहेत.
या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. पालकमंत्री चव्हाण यांनी सायंकाळी राजकोट इथं जात घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, हा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदलानं खंत व्यक्त केली असून, याप्रकरणी राज्य सरकार आणि नौदलाची एक समिती नियुक्त केली आहे. हा पुतळा पुन्हा एकदा उभारु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे हा पुतळा कोसळला. मात्र, लवकरच अधिक भक्कम पुतळा उभारु असं त्यांनी सांगितलं