शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित मुंबई ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज झालं, यावेळी ते बोलत होते. मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची सुविधा आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. मराठी संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचून आत्मचिंतन करा असं आवाहन त्यांनी केलं.
ग्रंथालय डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असं सामंत यांनी सांगितलं. रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदावावी, असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याठिकाणी केलं आहे.