राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तेलंगणात काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट २ लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्याप्रमाणे येत्या २७ तारखेला सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा करावी, असं ते म्हणाले.
विविध राज्यांमधे दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, पण महाराष्ट्रात फक्त २७ रुपये भाव मिळतो, आणि हेच दूध अमूल आणि इतर दूध कंपन्या ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर भावानं विकत आहेत. राज्य सरकारनं तातडीनं यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.