आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिले. ते पुणे इथल्या विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते. इंद्रायणी नदी स्वच्छतेचं काम तातडीनं करावं, पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करावं, मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करावी, पालखी मार्गालगतच्या जागा कायमस्वरूपी ताब्यात घ्याव्यात, या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. या पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणारा सर्व निधी शासनातर्फे पुरवला जाईल, अशी ग्वाहीही पवार यांनी या बैठकीदरम्यान दिली.
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहू नयेत यासाठी सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी आपली जबाबदारी चोख बजवावी,असे निर्देश या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला दिले.
आषाढी वारीच्या नियोजनासाठी आज मुंबईतही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वारीच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर, राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी आणि पुणे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाइन उपस्थित आहेत.