१८व्या ‘मिफ’, अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा सोहळा आज मुंबईत सुरु आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. इतर क्षेत्रासह भारत चित्रपटांच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. भारतीय कलावंत त्यांच्या कामाद्वारे जगभरात पोहोचत असल्याचं प्रतिपादन मुनगंटीवार यांनी यावेळी केलं. त्यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अभिनेते शेखर सुमन, अभिनेत्री छाया कदम, अभिनेता विशाल मल्होत्रा, दिग्दर्शक एमी बरुआ यांच्यासह इतर कलाकारांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीच्या सुवर्णशंख पुरस्कारासह इतर पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमात होत आहे. यावेळी ‘इंडिया इन अमृत काल’ या विभागात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार एडमंड रॅन्सन यांच्या ‘लाइफ इन लूम’ या लघुपटाला मुनगंटीवार यांनी प्रदान केला. पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार and towards happy alley या चित्रपटासाठी श्रीजॉय सिंग यांना चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी प्रदान केला. सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार ‘गुंतता हृदय हे’ यासाठी सूरज ठाकूर आणि ‘ धोटपाटण ‘ यासाठी बबिन दुलाल यांना संयुक्तरित्या देण्यात आला.