१८व्या ‘मिफ’ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘माहितीपट बझार’चं उद्घाटन ‘दिल्ली क्राइम’ या गाजलेल्या वेबसीरिजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत झालं.
विविध देशांचे, भाषांचे आणि विषयांवरचे माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशनपट दाखवण्यात आले. ‘माय मर्क्युरी’ या माहितीपटाचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आज ‘मिफ’मध्ये झालं. तत्पूर्वी माहितीपटाच्या दिग्दर्शक ज्युएल चिसेलेट आणि लॉयड रॉस यांनी वार्ताहरांशी संवाद साधला आणि या माहितीपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला.
चित्रपटांशिवाय, माहितीपटांचं अर्थकारण, आशयनिर्मिती, ऍनिमेशन अशा विविध विषयांवरची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रंही झाली. ‘पोचर’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक रिची मेहता यांनी ‘पोचरच्या अनुषंगाने गुन्हेगारी थरारपटाचे निर्मितीबंध’ या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला.