नवी दिल्लीत आजपासून बिमस्टेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची दुसरी परिषद सुरू झाली आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर असून त्यांनी उपस्थित समपदस्थांचं स्वागत केलं. त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात बिमस्टेक सहकार्यामध्ये नवीन ऊर्जा, संसाधनं आणि वचनबद्धता वाढवण्यासाठी ही चर्चा उपयुक्त ठरेल असं सांगितलं. तसंच या परिषदेच्या सत्रात कनेक्टिविटी, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, आरोग्य आणि अंतराळ क्षेत्रातील सहयोग, डिजीटल, सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्षमता तसंच यंत्रणेच्या गुणवत्तेवर चर्चा होणार आहे.
यावेळी जयशंकर यांनी उपस्थित देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्यासोबत बिमस्टेक देशांच्या सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली.