डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे, आतापर्यंत २८० सदस्यांचा शपथविधी

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता. आज अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला. 

 

शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके या आठ सदस्यांचा शपथविधी अद्याप झालेला नाही.

 

दरम्यान, सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला. सदा खोत, गोपीचंद पडळकर, विजय देशमुख, बालाजी किणीकर हे सदस्य या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ईव्हीएमवर शंका घेणं हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

 

निवडणुकीतल्या अपयशाचं खापर मतदानयंत्रावर फोडण्याची विरोधकांची कृती लोकशाहीला अपायकारक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा