महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.
महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. महायुती सरकारच्या कामाचा आढावा घेणारं काम हीच आमची ओळख हे रिपोर्ट कार्ड या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आलं.
महाविकास आघाडीचं स्थगितीचं सरकार २०२२ मध्ये जाऊन त्यानंतर महायुतीचं गती आणि प्रगतीचं सरकार आलं. महाराष्ट्रात परिवर्तन करणाऱ्या योजना महायुती सरकारनं केल्या. शेती, शिक्षण, नदीजोड तसंच सिंचन प्रकल्प, विविध प्रशासकीय घटकांसाठी दिलासा अशा योजना महायुती सरकारने आणल्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधक सातत्याने फेक नॅरेटिव्ह पसरवत होते. मात्र, एकाच टप्प्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २०२२ ते २०२४ या काळात आपल्याबद्दल विरोधकांनी आरोप केले. पण, महायुती सरकारनं फार विचारपूर्वक योजना जाहीर केल्या. सर्व घटकांना या योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्याचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डात आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.