विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आजचा भारत हा भावनांनी, युवा उर्जेनं परिपूर्ण आहे. त्याचे पडसाद भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी भारताचं ऑटो क्षेत्र जवळपास १२ टक्क्यानं वाढलं आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यातही वाढली आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमानिमित्तानं त्यांनी दिवंगत रतन टाटा आणि ओसामो सुझुकी यांचं स्मरण केलं. वाहन क्षेत्रातल्या प्रगतीच्या वाटेवर मध्यमवर्गीय माणसांची स्वप्नं पूर्ण करण्यात या दोघांचं मोठं योगदान आहे. असं ते म्हणाले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक वाहतुकीसाठी विशेष योजना आणल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.गुंतवणूक आणि निर्यात या दोन्हींमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारत २०४७च्या स्वप्नाला साकार देण्यासाठी या एक्स्पोचं मोठं योगदान असेल असंही गोयल यावेळी म्हणाले.
आज आपण प्रदूषण विरहित वाहतूक विषयावर चर्चा करत आहोत, जो फक्त पर्यावरणासाठीच नव्हे तर आरोग्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने सरकारने ऑटोमोबाईल क्षेत्रात सरकारने नव्या धोरणांचा स्वीकार केला आहे. उद्योगांना प्रोत्साहन देताना सरकारने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याचीही काळजी घेतल्याचं एच.डी. कुमारस्वामी म्हणाले.
हा एक्स्पो सहा दिवस चालणार असून येत्या २२ तारखेला त्याचा समारोप होईल. या दरम्यान, विविध कार्यक्रमांचं तसंच संमेलनांचं आयोजन केलं जाणार आहे. यात मोबिलिटी क्षेत्रातल्या धोरणांवरच्या विविध चर्चासत्रांचा समावेश असेल. यंदा भारत मंडपमसह, यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा इथेही या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे.