प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर इथं आज विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. डहाणू गावात ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. आशिया खंडातलं हे खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरामध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे १२ लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
पालघरमधे उभारण्यात येणारं वाढवण बंदर देशाच्या विकासात भरीव योगदान देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. खोल पाण्यातलं सर्वात मोठं बंदर असून त्यामुळे देशाच्या विकासकार्यात महाराष्ट्र अग्रभागी असल्याचं अधोरेखित होतं असं त्यांनी म्हटलं आहे.