प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांसोबतची धोरणात्मक, आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी आणखी बळकट करणं यावर त्यांच्या या दौऱ्यात मुख्य भर असणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत.
पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह-अध्यक्ष पद ते भूषवतील. या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहेत. फ्रान्सची भेट आटोपून १२ फेब्रुवारीला प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील.