भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या साहाय्यानं लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांंमध्ये भारताची ताकत सध्या वाढली आहे. तसंच गेल्या दहा वर्षात भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या एफडीआय आणि निर्यात क्षेत्रामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.