देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन, सरकार नागरिकांना रहाणीमानातली सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
देशाचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा दर आठ टक्क्यांपर्यंत पोचत असून, भारत जागतिक पातळीवरील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे दिवस फार दूर नसल्याचं मोदी म्हणाले. मोदी पुढे म्हणाले की, जगासाठी भारत हा विकास आणि स्थिरतेचा मार्गदर्शक ठरत असून सरकार ज्या वेगाने पायाभूत संरचना सुविधांची उभारणी करतो आहे, ती अभूतपूर्व आहे. भारताची धोरणं, समर्पण, दृढनिश्चय आणि निर्णयक्षमता, जगभरातून परदेशी गुंतवणूक आकर्षित करत आहे.