दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमधे पोहोचले. सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षण्मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग आणि इतर मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधांविषयी, तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल.
प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोल्किया यांच्याशी चर्चा केली. उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखीसंदर्भात महत्त्वाच्या करारावर उभय नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि ब्रुनेईचे दूरसंपर्कमंत्री पेंगिरान दातो मुस्तफा यावेळी उपस्थित होते. सुलतान हाजी हसन अल बोलकिया यांच्याशी उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याबद्दल समाधानकारक चर्चा झाल्याचं प्रधनमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.
उर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, आरोग्य, संरक्षण आदि क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या भेटीत विचारविनिमय झाल्याचं उभय नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. भारताचं धोरण विस्तारवाद नव्हे तर विकासवादाचं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीत स्पष्ट केलं.