भारतीय तरुणांच्या क्षमतेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून जागतिक नेत्यांना भारतीय तरुणांनी त्यांच्या देशात काम करण्याची अपेक्षा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे वडताल इथं श्री स्वामीनारायण मंदिराच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी आज सकाळी दूरदृश्य माध्यमाद्वारे संबोधित केलं. कुशल मनुष्यबळ असलेल्या भारतीय तरुणांची जागतिक मागणी आणखी वाढणार असून विकसित भारतासाठी तरुणांना सशक्त केलं पाहिजे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी सरकारनं २०० रुपयांचं चांदीचं नाणं आणि टपाल तिकीट जारी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षण, कौशल्य विकास, व्यसनमुक्ती आणि आधुनिकतेशी अध्यात्माची सांगड घालून नवीन पिढी घडवणं यासारख्या विविध क्षेत्रात स्वामीनारायण संस्थेच्या योगदानाचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं.
Site Admin | November 11, 2024 2:26 PM | गुजरात | प्रधानमंत्री | श्री स्वामीनारायण मंदिर