राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 19 तारखेपर्यंत मालावीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मालावीमध्ये द्विपक्षीय बैठका घेणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मॉरिटॅनियाचे अध्यक्ष मोहंमद औल्ड घझौनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
राष्ट्रपतींनी काल शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेतही भाग घेतला. उभय देशांमधले संबंध दृढ करण्यासाठी चार संयुक्त सहकार्य करारांवरही काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना बळ देण्यासाठी परस्परांशी चर्चा करणं, परदेशी संबंधविषयक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करणं, राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्टधारकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल करणं आणि उभय देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणविषयक कार्यक्रम आयोजित करणं यांच्याबाबत हे करार करण्यात आले आहेत.