डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला, तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या स्थापनादिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या. डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचं त्या म्हणाल्या,
प्रचंड गरीबीपासून ते जगातल्या महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमधे स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकेनं बघितला आहे. बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून ते कोरोनाच्या संकटापर्यंत अनेक टप्प्यांचा त्यात समावेश आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटना, सायबर धोके याचा सामना रिझर्व्ह बँक तत्परतेनं करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष ‘माय स्टॅम्प’चं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं.

 

बदलतं तंत्रज्ञान आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यपूर्ण नेतृत्व आणि दूरदृष्टीची अपेक्षा देशाला आहे, असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्त्वाचं असून आर्थिक समावेशन, ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे, अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली. या संस्थेचा गौरवशाली इतिहास साजरा करतानाच भविष्यातल्या आव्हानांसाठी सज्ज राहणंही गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा