मुसळधार पाऊस असतानाही पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. देशोदेशीच्या खेळाडूंच्या पथकांनी मैदानात नेहेमीच्या प्रथेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं संचलन केलं. जवळपास सात हजार खेळाडूंनी पॅरिसमधल्या सीन नदीतून बोटीतून येऊन उपस्थितांना अभिवादन केलं. ज्युदोमध्ये तीन वेळा विजेता ठरलेला टेडी रायनर यानं ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. भारताच्या पथकाचं नेतृत्व पीव्ही सिंधू आणि शरत कमल यानी केलं.
आजपासून स्पर्धांना सुरुवात होत असून जगभरातील सात हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी रोइंग, १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी, १० मीटर एअर पिस्तूल पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धा, टेनिसमध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा, बॅडमिंटन क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी गटात, तर टेबल टेनिस क्रीडा प्रकारात पुरुष एकेरी गटात, पुरुष हॉकी आणि महिलांच्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आज आपलं क्रीडा कौशल्य आजमावतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे भारतीय पथकातील खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.