भारत आणि इंडोनेशिया लष्कराच्या गरुड शक्ती या सरावाचं नववं सत्र यंदा इंडोनेशियात जकार्ता इथं होत आहे. हे सत्र येत्या १२ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या संयुक्त सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची २५ जवानांची तुकडी आज जकार्ताला रवाना झाली. या तुकडीचं प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट करत आहे.
दोन्ही देशांच्या लष्कराची कार्यपद्धत समजून घेणं, दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमध्ये परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि परस्पर संबंध वाढवणं हे या सरावाचं उद्दिष्ट आहे. या अनुषंगानं या सरावात दोन्ही देशांमधली जीवनशैली आणि संस्कृती समजून घेण्यासोबतच जंगलांमधल्या विशेष संयुक्त मोहिमा, दहशतवादी तळांवर कारवाया, विशेष दलांच्या मूलभूत आणि प्रगत कौशल्यांचा सरावांचं आयोजन, तसंच शस्त्रास्त्र, लष्करी उपकरणं, नवोन्मेष, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धतींविषयीच्या माहितीची देवाण घेवाण अशा उपक्रमांचंही आयोजन केलं गेलं आहे.