वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गदारोळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या १० खासदारांना समितीतून निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस, डीएमके, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांचा यात समावेश आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या विरुद्ध असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप भाजपानं केला.
तर बैठकीचा विषय अचानक बदलल्याचा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बैठकीत मूळ मुद्द्यांचा समावेश न केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. या संयुक्त संसदीय समितीमध्ये लोकसभेतले २१ आणि राज्यसभेतल्या १० खासदारांचा समावेश आहे.