राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त वार्ताहर परिषदेत ही मागणी केली. निवडणूक आयोगानं दाद दिली नाही, तर आपल्याला न्यायालयाकडे जावं लागेल असं राहुल गांधी म्हणाले. राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते, असा आरोप त्यांनी केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या ३९ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं दिली पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक पारदर्शी पद्धतीनं घेण्याची जबाबादारी निवडणूक आयोगाची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागणार असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं म्हटलं आहे.