डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उत्तर प्रदेशात महाकुंभ मेळ्याला सुरुवात, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांचं अमृत स्नान

महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं सुरुवात झाली. या महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी स्नानासाठी आलेल्या भाविकांचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आलं. २६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्री पर्यंत चालणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी लाखो भाविक जमले असून आज दीड कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं वृत्त आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलं आहे.

 

प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ हा जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा असून  त्यात ४५ कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहतील असा अंदाज  आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महाकुंभ नगरमधील मंदिरं आणि प्रमुख स्थळांवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. या ठिकाणी सात थरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ५० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. निगराणी ठेवण्यासाठी २ हजार आठशे सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित कॅमेरे लावले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक भानु भास्कर आणि पोलीस उप महानिरीक्षक राजेश द्विवेदी यांनी आज परिसराची पाहणी केली. नद्या आणि घाटांची स्वच्छता करण्यासाठी दोन हजार स्वच्छता दूतही तैनात करण्यात आले आहेत. 

 

प्रयागराजला ये-जा करणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून रेल्वेच्या तीन हजार ३०० विशेष गाड्यांसह १० हजारपेक्षा जास्त गाड्या धावत आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि इतर गोष्टींवर प्रशासनानं विशेष भर दिला आहे, अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा