विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात ४२ मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते.
विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, सत्ताधारी सदस्यच कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत आहे ही गंभीर परिस्थिती आहे याची उत्तरे सरकारने द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मिहान प्रकल्पात अजून मूलभूत सुविधाच नाहीत, विदर्भातील खनिज संपत्तीचा योग्य वापर होत नाही, विदर्भात किती रोजगार आला, टेक्सटाइल पार्क चे काय झालं, राज्यात किती नवी उद्योग आले, ते कुठे उभे राहिले, त्यातून किती रोजगार मिळाला , राज्यातील अनेक एमआयडीसी क्षेत्र उद्योगांच्या प्रतीक्षेत आहेत याची देखील उत्तरे द्या अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
कोकणात रिफायनरी सह किती उद्योग आले, आरोग्य विभागातील खरेदी पद्धती बदलून खासगी कंपन्यांवर मेहेरबानी कोणी केली, मुंबईत
राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला नोटिसा देऊन मुंबई बाहेर का काढण्यात येत आहे, महिलांवर होणारे अत्याचार वाढले , राज्याची आर्थिक शिस्त पूर्ण बिघडली आहे असे थेट आरोप जाधव यांनी यावेळी केले.