केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या १२ पैकी सर्वात मोठा औद्योगिक पार्क राज्यात रायगड जिल्ह्यातल्या दिघीमध्ये होणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक विचारणा होत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत दिली. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यंदाचा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा असून पुढच्या साडेतीन वर्षांमध्ये भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सर्वात जास्त सहकारी संस्था असल्याने प्रस्तावित राष्ट्रीय सहकारी धोरणाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असंही त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, अनेक योजना निरंतर पद्धतीने सुरू असतात, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी वाढवण बंदर, मुंबई मेट्रो, शहरी दळणवळण प्रकल्प, विदर्भ-मराठवाड्यासाठीच्या सिंचन योजना यासह अर्थसंकल्पातल्या विविध तरतुदींचा उल्लेख केला.